केजरीवालांनी मोडला अण्णांचा रेकॉर्ड; उपोषण सोडणार

वीज आणि पाण्याच्या वाढत्या बिलांविरुद्ध आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 6, 2013, 08:27 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
वीज आणि पाण्याच्या वाढत्या बिलांविरुद्ध आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेत. पण, कोणत्याही सरकारनं लक्ष न दिल्यानं कोणत्याही आश्वासनाशिवाय आज (शनिवारी) ते आपलं उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे.
आज केजरीवाल यांच्या उपोषणाचा १५ वा दिवस आहे. यापूर्वी अण्णा हजारे यांनी जनलोकपालसाठी रामलीला मैदानावर १३ दिवसांचं उपोषण केलं होतं. केजरीवालांनी अण्णांचा हा उपोषणचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. केजरीवाल यांनी आपण शनिवारी उपोषण सोडणार असल्याचं म्हटलंय. दिल्ली सरकारनं पाणीपट्टी आणि वीजदर कमी करावे या मुख्य मागणीसाठी ते उपोषणला बसले होते. ‘आप’च्या आंदोलनाचा दुसरा टप्पा शनिवारपासून सुरू होणार आहे.

काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यातर्फे एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांची एकही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. केजरीवाल यांची प्रकृती झपाट्याने खालावत आहे, दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार ते आज उपोषण मागं घेत असल्याचं समजतं. त्यानंतर ते २५ एप्रिलपासून वीज आणि पाण्याच्या मुद्द्यावरूनच नवे आंदोलन सुरू करणार आहेत.