नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान अटारी बॉर्डरवर रविवारी ३६० फुटाचा उंच झेंडा फडकवण्यात आला. हा देशातील सर्वात उंच झेंडा असल्याचं बोललं जातंय. हा तिरंगा १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद आहे. हा झेंडा उभारण्यासाठी ३.५० कोटींचा खर्च आला आहे.
पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी हा सर्वात उंच झेंडा फडकवला. याआधी झारखंडमधील रांचीमध्ये सर्वात उंच २९३ फुटांचा तिरंगा फडकवण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय सीमेवर तिरंगा फडकवल्याने पाकिस्तान खूश नाही आहे. पाकिस्तान रेंजर्सने सीमा सुरक्षा दलाकडे असंतोष व्यक्त केला आहे आणि सीमेपासून लांब झेंडा फडकवण्यास सांगितलं आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना भीती आहे की, भारत या झेंड्याचा वापर जासूसीसाठी करु शकतो.
भारतीय अधिकारिऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, हा झेंडा सीमेच्या झिरो लाईनपासून २०० मीटर लांब उभारण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं उल्लंघन झालेलं नाही. मंत्री अनिल जोशी यांनी म्हटलं की, हा आमचा राष्ट्रीय ध्वज आहे आणि याला आमच्या धरतीवर फडकवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.