www.24taas.com, नवी दिल्ली
कोळसा खाण घोटाळ्यावरून सलग सातव्या दिवशी संसदेचं कामकाज ठप्प झालय. मात्र केवळ हाच मुद्दा नाही तर यापूर्वी अशा बऱ्याच विषयांवर संसदेचं कामकाज तहकूब करावं लागलंय. २०११-२०१२ मध्ये संसदेचं कामकाज कितीतरी वेळा ठप्प झालं.
घोषणाबाजी, गोंधळ आणि संसदेचं कामकाज ठप्प... संसदेतलं हे दृश्यं प्रत्येक अधिवेशन काळात पहायला मिळतं. अर्थात कामकाज ठप्प होण्याचे मुद्देही दरवेळी वेगवेगळे असतात. मात्र ‘झी 24 तास’नं केलेल्या संशोधनातून एक धक्कादायक माहिती समोर आलीय...
२०११-२०१२ दरम्यान ६४ खासदारांनी संसदेत एकही प्रश्न विचारलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे यात काही दिग्गज नावांचाही समावेश आहे. भाजप असो वा काँग्रेस, लालू असोत वा मुलायम किंवा शरद यादव... या वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावरच त्या-त्या पक्षाचे खासदार चालतात. पण या ६४ खासदारांमध्ये या नेत्यांचंही नाव आहे. जनतेनं ज्या लोकांच्या हाती देशाचं नेतृत्व दिलंय त्यातल्या अवघ्या २० खासदारांनीच २०११-२०१२ मध्ये संसदेत १०० टक्के उपस्थिती लावलीय. २०११-२०१२ मध्ये संसदेचं कामकाज ८५ दिवस चाललं. त्यात ३७० तास ५४ मिनिटं कामकाज झालं. याचाच अर्थ गदारोळामुळे संसदेचे १७५ तास ५१ मिनिटं वाया गेली. या दरम्यान संसदेच्या कामकाजात तब्बल १२ हजार २०१वेळा बाधा आली.
हे आकडे एका संशोधनातून समोर आलेत. मात्र ही माहिती धक्कादायक आहे. राजकीय नेत्यांच्या वादात सर्वसामान्यांचा पैसा पाण्यात जातोय आणि यात सर्वसामान्यांशी निगडीत असलेले अनेक प्रश्नही विरून जातायेत. पण हे सगळं जनतेचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्यांच्या लक्षात तरी केव्हा येणार?