चंदिगड : जाट समाजाने आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे हरयाणा राज्य सध्या धुमसत आहे. जाट समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांत आरक्षण दिलं जावं, अशी या आंदोलकांची मागणी आहे. दिवसेंदिवस या राज्यातील परिस्थिती चिघळता चालली आहे.
या आंदोलनात आत्तापर्यंत तीन जणांचा मृ्त्यू झाल्याची बातमी आहे तर किमान २५ जण जखमी झाले आहेत. हरयाणा सरकारने केंद्राकडे मदत मागितली असता काल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि गृह सचिव राजीव मेहेरषी यांच्यात एक बैठक झाली.
हरयाणा राज्यातील नऊ जिल्ह्यांत आर्मीला पाचारण करण्यात आले आहे. तर रोहतक आणि भिवानी या दोन सर्वाधिक हिंसाचार सुरू असलेल्या जिल्ह्यांत आता कर्फ्यू लावण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांत जमाव दिसताच गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
रोहतक शहरात आंदोलनकर्त्या जमावाने मॉल्स लुटले, गाड्या आणि ट्रक्स पेटवून दिले आहेत. याच शहरात टोल नाक्यांचीही तोडफोड करण्यात आली आहे. महर्षी दयानंद विद्यापीठाच्या परिसरात जमावाने एका पोलीस अधिकाऱ्यावरही हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या आंदोलनामुळे हरयाणात येणारे जीवनावश्यक वस्तूंच्या मालाचे ट्रक अडकून पडले आहेत. आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले आहे. रेल्वे रुळांचेही काही ठिकाणी नुकसान केले गेल्याने शेकडो गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याच्या काही भागांत मोबाईल आणि इंटरनेट सेवाही प्रशासनातर्फे खंडीत केल्या गेल्या आहेत.
दरम्यान हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाचा अवलंब केल्यास त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे.