नवी दिल्ली : शहीद हवलदार हंगपन दादा यांना गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं. देशातील हे सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पदक आहे. डोळ्यात पतीच्या अभिमानाचा भाव घेऊन हंगपन दादा यांची पत्नी श्रीमती चासेल लवांग यांनी हा सम्मान स्वीकारला.
शहीद हवलदार हंगपन दादा यांनी जम्मू-कश्मीरमध्ये एका एनकाउंटरमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. चकमकीत ते शहीद झाले. नॉर्थ कश्मीरमधील कुपवाडामध्ये २७ मेला १२५०० फूट उंच काही दहशतवादी सीमाभागातून घुसखोरी करत असतांना ३६ वर्षाच्या हंगपन दादा यांनी शौर्य दाखवत त्यांचा सामना केला.
अरुणाचल प्रदेशातील बोदुरिया गावचे राहणारे हवलदार हंगपन त्यांच्या टीममध्ये दादा च्या नावाने लोकप्रिय होते. १९९७ मध्ये सेनेच्या आसाम रेजीमेंटमध्ये ते दाखल झाले होते. त्यांनी एकटेच या दहशतवाद्यांशी सामना करत त्यांना घुसखोरीपासून रोखलं होतं.