अहमदाबाद : हेमा मालिनीला देण्यात येणाऱ्या भूखंडाचा वाद मिटत नाही तोच आता भूखंडामुळे भाजप पुन्हा गोत्यात आलं आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मुलगी अनार जयेश पटेल पार्टनर असलेल्या वाइल्डवूड कंपनीवर गुजरात सरकार मेहरबान झालं आहे. या कंपनीला मोक्याच्या ठिकाणी 422 एकर सरकारी जमीन कवडीमोल भावानं देण्यात आली आहे. फक्त 15 रुपये प्रती चौरस मीटर दरानं ही जमीन देण्यात आली आहे. यापैकी 250 एकर जमीन गीर अभयारण्याजवळची आहे.
2010-2011मध्ये वाइल्डवूड रिसॉर्ट आणि रिअॅलिटीजला गुजरात सरकारनं 250 एकर जमीन मंजूर केली. त्यानंतर परत 172 एकर जमीन सरकारनं याच कंपनीला दिली. ही जमीन शेतची असली तरी सरकारनं ती बिनशेती केली. मुख्य म्हणजे ही जमिन महसूल खात्यानं बिनशेती केली असताना आनंदीबेन पटेल महसूल मंत्री होत्या.
या सगळ्या प्रकारामुळे आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी केली आहे.