गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्वाकांशी जीएसटी विधेयक मंजूर राज्यसभेत पारीत झाल्यानंतर आता. आसाम विधानसभेने आज वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयक सर्वसंमतीने मंजूर झालेय. देशात आसाम हे पहिले राज्य ठरले आहे.
संपूर्ण देशात समान कर पद्धत राबविण्याचा प्रस्ताव असलेले जीएसटी विधेयक देशातील अनेक राज्यात मंजूर होणे आवश्यक आहे. कारण त्यानंतर हे विधेयक कायद्यात रुपांतर होईल. त्याचा श्रीगणेशा आसामपासून झालाय.
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले जीएसटी विधेयक आसाम विधानसभेत सर्वसंमतीने मंजूर केले जात असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष रंजितकुमार दास यांनी केली. विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि एआययूडीएफच्या सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला.
विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी विरोधकांचे आभार मानले. जीएसटीसाठी १२२वे घटनादुरुस्ती विधेयक-२०१४ ला आसाम विधानसभेने मंजुरी दिल्यानंतर अध्यक्ष दास आणि राज्याचे अर्थमंत्री हिंमतविश्वा शर्मा यांनी एकमेकांना मिठाईने तोंडगोड केले.