नवी दिल्ली : देशातील प्रमुख दुरध्वनी कंपन्या शुक्रवारपासून नॅशनल मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा सुरू करणार आहेत. म्हणजे जर तुम्ही बंगळुरूमध्ये नोकरी सोडून, आणि मुंबईत नोकरीला आले, तर मुंबई सर्कलमध्ये तुम्हाला तुमचा बंगळुरूचा नंबर कायम करता येईल, त्यासाठी तुम्हाला नंबर बदलण्याची गरज नाही.
तसेच तुम्ही सर्कल बदलत असतांना, तुम्हाला नको असलेल्या मोबाईल कंपनीची सेवा सोडून, इतर मोबाईल कंपनीची सेवा तुम्हाला घेता येणार आहे. नॅशनल पोर्टेबिलिटीमुळे देशात तुम्ही कुठेही गेलात, तरी तुम्हाला मोबाईल नंबर बदलण्याची गरज पडणार नाही.
समजा, तुमचा मित्र लष्कराच्या सेवेत दिल्लीत अथवा जम्मू काश्मीरमध्ये असेल, यानंतर त्याची बदली आसाममध्ये झाली, तरीही त्याला मोबाईल नंबर बदलण्याची गरज नाही. तसेच नॅशनल पोर्टेबिलिटी करतांना तुम्हाला हव्या असलेल्या मोबाईल कंपनीची सेवा निवडण्याची तुम्हाला संधी आहे.
आतापर्यंत नंबर पोर्टेबिलिटीची सेवा फक्त एका सर्कलमध्येच होती, ती आता सर्व सर्कलमध्ये देण्यात येत आहे. ही सेवा सुविधा सुरू करणाऱ्या कंपन्यांमध्ये वोडाफोन, आयडिया, एअरटेल, यूनिनॉर, व्हिडीओकॉन, बीएसएनएल, एमटीएनएल, आरकॉम आणि सिस्तेमा श्याम यांचा समावेश आहे.
एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार २४ तासांच्या नंबरपोर्टेबिलीटीची सेवा देण्यात येईल, तसेच रोमिंगसाठी कोणतंही शुल्क आकारणार नसल्याचं म्हटलंय.
नव्या शहरात आपला नंबर कायम राखण्यासाठी ग्राहक राष्ट्रीय एनएनपी सेवेचा लाभ घेऊ शकतात, असं वोडाफोनने म्हटलं आहे, आयडिया सेल्यूलरनेही आपण एमएनपी सेवेसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.