`तोमर यांना आंदोलनकर्त्यांनी मारहाण केलीच नव्हती`

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सुभाष चंद तोमर यांना आंदोलनकर्त्यांनी मारहाण केली नव्हती तर ते चालता-चालता अचानक चक्कर येऊन रस्त्यावर पडले होते, असा दावा एका प्रत्यक्षदर्शीनं केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 26, 2012, 12:35 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सुभाष चंद तोमर यांना आंदोलनकर्त्यांनी मारहाण केली नव्हती तर ते चालता-चालता अचानक चक्कर येऊन रस्त्यावर पडले होते, असा दावा एका प्रत्यक्षदर्शीनं केलाय.
सुभाष चंद तोमर यांनी मंगळवारी राम मनोहर लोहिया हॉस्पीटलमध्ये शेवटचा श्वास घेतला होता. आत्तापर्यंत देशाच्या राजधानीत दिल्ली गँगरेप घटनेनंतर सामान्यांचा उसळलेल्या संतापाला तोमर बळी पडले असं समजलं जात होतं. २३ डिसेंबर रोजी टिळख रोडवर ते जखमी अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. पण, प्रत्यक्षदर्शी योगेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्वत: आणि त्यांच्या एका मैत्रिणीनं मिळून या जखमी कॉन्स्टेबलला हॉस्पीटलमध्ये दाखल केलं होतं. आंदोलनादरम्यान योगेंद्र आणि त्यांची मैत्रिण हे दोघेही जखमी झाले होते. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीस पुढे सरकले त्यावेळी तोमर यांची प्रकृती ठीक नसल्याचं योगेंद्र यांना जाणवलं होतं.
दिल्ली पोलिसांनी मात्र, हा दावा साफ फेटाळून लावलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार तोमर यांना आंदोलनकर्त्यांनीच मारहाण केली होती आणि याच प्रकरणी आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय. यामध्ये आम आदमी पार्टीच्या एका सदस्याचाही समावेश आहे.
तोमर हे मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठचे रहिवासी होते. त्यांची नियुक्ती करावल नगर भागात झाली होती. रविवारी गँगरेपविरुद्धच्या आंदोलनाला थोपवण्यासाठी त्यांना इंडिया गेटवर बोलवण्यात आलं होतं. टिळख रोडवर ते जखमी अवस्थेत सापडले होते. त्यानंतर तात्काळ त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.