पणजी : गोव्यात आता समुद्र किनाऱ्यांवर मद्यपान करणाऱ्यांची खैर नाही. समुद्र किनाऱ्यावर मद्यपान केले तर तुमच्या खिशाला भुर्दंड पडू शकतो. तोही पाच हजार रुपयांचा. तसेच कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आलेय.
समुद्रकिनाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास गोवा राज्य सरकारने प्रतिबंध केला आहे. याबाबतचे तसे फलकही किनारपट्टीवर लावले जाणार आहेत. किनाऱ्यावर मद्यपान केले तर यापुढे पाच हजार रुपये दंड भरावा लागेल, असा इशारा पर्यटन उपसंचालक पामेला माश्कारेन्स यांनी दिला आहे.
कचरा टाकणाऱ्यांनाही दंड ठोठावला जाईल. तसेच कारवाईसाठी त्यांना ताब्यात घेतले जाईल. तसेच प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर यंदाच्या पर्यटन मोसमात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत, असे ते म्हणालेत. पणजी येथे पर्यटन खात्याने आयआरबी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या कृतीसत्राप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.
समुद्रकिनारी भागात सर्व मोसमात आयआरबी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पर्यटकांनी नियमांचे पालन न केल्यास काय करावे यासंदर्भात हे प्रशिक्षण असेल. विशेष देखरेखीसाठी आणि गस्त घालण्यासाठी पथकांसाठी दहा नवीन वाहने असणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.