नवी दिल्ली: (रश्मी पुराणिक, प्रतिनिधी) - दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांवरचं न्याय मागण्याची वेळ आलीय. सदनातील छोट्या खोल्या, उत्तर प्रदेशातील खासदारांना दिली जाणारी विशेष वागणूक, खराब पाणी आणि जेवण याविरोधात शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आज महाराष्ट्र सदनात साडे तीन तास आंदोलन केलं.
जर सोमवारपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय. सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी शिवसेनेच्या खासदारांना न भेटता तब्येत खराब असल्याचं कारण दिलंय.
जेव्हापासून दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदन सर्वांसाठी खुलं झालंय,वारंवार अनेकांनी इथल्या व्यवस्थापनाविषयी तक्रार केली. इथं लोकांना नीट वागवलं जात नाही, खोल्या दिल्या जात नाही... अशुध्द पिण्याचे आणि वापरायचे पाणी, खराब जेवण या तक्रारी अनेकांनी केल्या. पण यावेळी ही तक्रार शिवसेनेच्या खासदारांनी केलीय. ते ही आंदोलन करून....
आज दुपारी साडेबारावाजल्यापासून शिवसेनेच्या खासदारांनी सदनाच्या व्यवसाथपनाला प्रश्न विचारून भांडावून सोडलं. उत्तर प्रदेशमधील खासदारांना मंत्र्याचे सूट दिले जातात. पण खासदारांना छोट्या खोल्या दिल्या गेल्यात. त्यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कुटुंबियांना खोली देण्याचंही सदनानं नाकारलं. यासंदर्भात पत्र लिहूनही महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापनानं दखल न घेतल्यानं शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन केलं.
शिवसेनेच्या खासदारांनी सदनातील कँटीनची पाहणी केली. अतिशय खराब सूप, भाजी, कॅटीनमधील घाण हे सर्व खासदारांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनाही दाखवलं. हे सर्व सुरू असताना सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी आजारी असल्याचं सांगून खासदारांना भेटणं टाळलं. त्यामुळं अखेरीस सदनात आलेल्या मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी शिवसेनेच्या खासदारांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. जर सोमवारपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपल्या स्टाईलनं आंदोलन करण्याचं इशारा खासदार संजय राऊत यांनी दिलाय.
महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्यांनीही खासदारांना कॅमेरे टाळून इथल्या दुरावस्थेची माहिती दिली. महाराष्ट्र सदनातील कँटीनमधील जेवण बनवणाऱ्यांना इथल्या मराठी महिल्या अधिकाऱ्यानं चपाती कशी बनवायची हे शिकवलं,यातून महाराष्ट्र सदनाची अवस्था काय आहे आणि महाराष्ट्रातील मराठी खासदारांनाच आज आंदोलन करण्याची वेळ आली याहून दुदैवं ते काय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.