चेन्नई : पूराचा तडाखा बसलेल्या तामिळनाडूतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. विमानतळावरही साचलेले पाणी ओसरल्याने चेन्नईच्या विमानतळावरुन देशांतर्गत विमानसेवा आजपासून सुरु केली जाणार आहे.
एअर इंडियाचे एआय ५४९ हे विमान नियोजित वेळेप्रमाणे सकाळी १० वाजता टेक ऑफ होईल. तर एरलाईन्स एआय ४२९ हे विमान चेन्नई विमानतळावर दुपारी १.४० मिनिटांनी उतरेल अशी माहिती पीटीआयकडून देण्यात आली.
ही सेवा केवळ दिवसासाठी सुरु करण्यात आली असून याबाबतचा पुढील निर्णय हवाई नियंत्रण विभागाकडून घेण्यात येईल. दरम्यान, पुढील २४ तासांत शहर आणि इतर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज स्थानिक हवामान खात्याने व्यक्त केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी पूरग्रस्त भागातील पिडीतांसाठी मदत जाहीर केली. या पुरामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. या पुरामध्ये आतापर्यंत २४५ लोकांचा बळी गेलाय.
लष्कराचे पथक आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक दोन्ही कार्यरत असून आतापर्यंत तीन लाख ५० हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरित कऱण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.