www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ला झालेल्या गँगरेप आणि हत्ये प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. कोर्टानं चारही आरोपींना दोषी ठरवलं असून याबाबतची शिक्षा कोर्ट उद्या सुनावणार आहे.
या गँगरेप प्रकरणी बस चालकासह सहा नराधमांना अटक करण्यात आली होती. त्यातील रामसिंह यानं तुरुंगातच आत्महत्या केली होती. तर मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर या चौघांवर साकेत कोर्टात खटला चालू होता. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाइल कोर्टानं यापूर्वीच तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
या सर्व आरोपींवर गँगरेप, हत्या, दरोडा, अपहरण आणि पुरावे नष्ट करणे या आरोपींखाली दोषी ठरवण्यात आलंय. याशिवाय अनैसर्गिक शारिरीक संबंध आणि कट रचने या आरोपांसाठीही आरोपींना दोषी ठरवलं गेलंय.
घटनेच्या सात महिन्यांनंतर दिल्ली फास्ट ट्रॅक कोर्ट उद्या सकाळी ११ वाजता आपला निर्णय सुनावणार आहे. आता या आरोपींना काय शिक्षा होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आरोपींना फाशीच देण्याची मागणी सर्वस्तरातून केली जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.