गडकरींच्या याचिकेनंतर केजरीवालना समन्स

दिल्लीच्या एका न्यायालयानं मानहानी प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स जारी केलं आहे.

Updated: Feb 28, 2014, 04:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीच्या एका न्यायालयानं मानहानी प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स जारी केलं आहे.
मानहानीचा दावा भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांच्याकडून करण्यात आला आहे.
नितिन गडकरी हे भ्रष्ट असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं. यावरून नितिन गडकरी यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे.
महानगर दंडाधिकारी गोमती मनोचा यांनी अरविंद केजरीवाल यांना पुढील सुनावणीसाठी, ७ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
केजरीवाल यांनी ३१ जानेवारी रोजी भारतातील सर्वात भ्रष्ट लोकांची यादी तयार केली, यात नितिन गडकरी यांचाही बेजबाबदारपणे उल्लेख करण्यात आला होता, असं नितिन गडकरी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय.
भाजप नेते नितिन गडकरी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. केजरीवाल यांनी गडकरींची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केलं आहे.
न्यायालयाने १८ फेब्रुवारी रोजी गडकरी आणि दोन साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
गडकरींकडून न्यायालयाला आम आदमी पार्टी प्रमुखांविरोधात खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती.
केजरीवाल यांनी केलेले आरोप खोटे, आधारहीन आणि मानहानी करणारे आहेत.
केजरीवाल यांचं वक्तव्य वृत्तपत्रांमध्येही छापून आल्याने, आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागला असल्याचं गडकरींनी याचिकेत म्हटलं आहे.