नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनातही गोवा आणि मणिपूर सरकार स्थापनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे.
गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला होता. मात्र सत्ता स्थापनेच्या रेसमध्ये काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपने आघाडी घेतली. गोव्यात केंद्रीय मंत्री आणि नितीन गडकरी यांच्या रणनीतीपुढे काँग्रेस निष्प्रभ ठरल्याचं पाहायला मिळालं. भाजपनं रविवारी रात्री राज्यपालांची भेट घेत गोव्यात सत्ता स्थापनेचा दावाही केला.
मात्र काँग्रेसनं या सगळ्या प्रकाराबाबत राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय. निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण न देऊन लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. त्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली आहे.
आता संसदेतही काँग्रेस हाच मुद्दा उचलून धरणार आहे. गोव्यासोबत मणिपूरमधील राजकीय परिस्थितीबाबतही काँग्रेस नेते संसदेत आवाज उचलणार आहेत. त्यामुळे संसदेत कामकाज होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी सर्वोच्य न्यायालयाकडे लक्ष आहे.