नवी दिल्ली : हैदराबादच्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण अजूनही चर्चेत असताना जेएनयूमधील आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलीय. मुथुकृष्णन उर्फ रजनी क्रिश असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो जवाहरलाल नेहरु विद्यापीठात एम.फीलचा विद्यार्थी होता.
दिल्लीच्या मुनिरका विहारमधील एका खोलीत त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मुथुकृष्णन सोमवारी दुपारी आपल्या मित्राच्या घरी गेला होता. जेवणानंतर झोपायला जातो असं मित्राला सांगून त्यानं आपली खोली बंद केली. त्यानंतर त्याला उठवण्यासाठी मित्रांनी ब-याचदा आवाज दिला. मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नसल्यानं पोलिसांना पाचारण करण्यात आलं.
मुथुकृष्णन याच्या आत्महत्येचं कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्याच्या मृतदेहाजवळ किंवा खोलीत सुसाईड नोटही आढळली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय.