www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय लष्करात एका हवाई बोफोर्स घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. एका इटालीयन कंपनीक़डून 12 VVIP हेलिकॉप्टरची खरेदी करण्यासाठी लाचखोरी केल्याचा माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागी यांच्यावर आरोप झाल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं म्हटलंय.
संरक्षण मंत्रालयानं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. इटलीमधल्या फिनमेकॅनिका या कंपनीची अगस्ता वेस्टलँड जातीच्या विमानांची ही खरेदी झाली होती. कंपनीच्या सीईओला या प्रकरणी ३५० कोटी रुपयांच्या दलाली प्रकरणी अटक झालीये.
याबाबत माहिती देताना संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांनी त्यागींच्या सहभागाबाबत स्पष्ट बोलण्यास नकार दिला. मात्र आरोपांमध्ये तत्थ्य असेल, तर हा करार रद्द केला जाईल, असंही अँटोनी यांनी म्हटलंय.
अगस्तावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. हा व्यवहार तातडीनं रद्द करण्याची मागणी भाजपनं केलीय. तसंच तत्कालीन वायू दलाच्या प्रमुखांचीही चौकशी करण्याची मागणी भाजपनं केलीय.
दरम्यान, हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात कसलाही सहभाग नसल्याचे हवाई दलाचे माजी प्रमुख शशी पी. त्यागी यांनी म्हटलंय. आपला कार्यकाल सुरू होण्याआधीच याबाबतच्या टेंडरमध्ये बदल करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला आहे.
ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यागी यांच्यावर करण्यात आला आहे. ऑगस्टा वेस्टलँडमूळ कंपनी `फिनमेकॅनिका`चा मुख्य कार्यकारी अधिकारी गिसेपी ओर्सी यांना काल मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी चौकशीसाठी आपण तयार असल्याचे त्यागी यांनी सांगितले.