www.24taas.com, नवी दिल्ली
बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी नितीशकुमारांचे सुरु असलेले प्रयत्न लवकरच फळाला येण्याची शक्यता आहे. मागास राज्याचा दर्जा ठरवण्याबाबतचे निकष नव्यानं निश्चित करण्याचे संकेत केंद्र सरकारनं दिलेत. येत्या दोन महिन्यात याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी नितीश कुमारांनी नुकतीच नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जाहीर सभा घेतली होती. ‘बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देईल त्याला आम्ही त्याला लोकसभेच्या निवडणूकीत पाठींबा देऊ’ असं त्यांनी याआधीच जाहीरही करून टाकलंय. याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करत काँग्रेस बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
यासाठी नितीश कुमार यांनी नुकतीच पंतप्रधान मनमोहन सिंह आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचीही भेट घेतली होती. द्रमुकनं पाठिंबा काढल्यानं यूपीए सरकारला नव्या मित्रांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत नितीशकुमारांना आपल्या कॅम्पमध्ये ओढण्यासाठी, विशेष राज्याचं कार्ड केंद्र सरकार वापरण्याची शक्यता आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणूकीच्या आधीच बिहारला हा दर्जा देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. सूत्रांच्या माहितीनुसार, मागील विकासावर लक्ष केंद्रीत करता केंद्र सरकार बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यास तयार आहे.