चिमुरडीला जिवंत पुरणाऱ्या भोंदूबाबाला अटक

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील झुंजरवाड येथे मंगळवारी रात्री १ वाजता ७ वर्षीय मुलीवर जीवघेणा अघोरी प्रकार केल्याप्रकरणी भोंदूबाबासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 28, 2014, 12:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बेळगाव
कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील झुंजरवाड येथे मंगळवारी रात्री १ वाजता ७ वर्षीय मुलीवर जीवघेणा अघोरी प्रकार केल्याप्रकरणी भोंदूबाबासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. भोंदूबाबाने २२ दिवसांपासून चितेजवळ एका खड्यात पुरले होते. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे बेळगाव जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.
अथणीचे तहसिलदार अपर्णा पावटे, महिला बाल विकास विभागचे अधिकारी चितळे, पोलीस उपअधिक्षक एस. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलीची सुटका केली. तिला अधिक उपचारासाठी अथणीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आली आहे.
सदाशिव तथा महावीर नेमगौडा आप्पय्या स्वामी (५०), चिक्काप्पय्या तथा गुरूपाद पाटील या दोघांनी पोलीस अटक केली. गेली अनेक वर्ष अथणी येथे त्यांचा मठ आहे. महाशिवरात्रीला चमत्कार करून तिला पुर्नरजन्म देण्याचा दावा या भोंदूबाबाने केला होता. त्यासाठी तिला चितेजवळ जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला. तिला २२ दिवस एका खड्ड्यात पुरण्यात आले होते.
हा भोंदूबाबा लहान मुलांचे शोषण करीत असल्याचे पुढे आले आहे. ज्या मुलीला पुरण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी गेल्या वर्षभरापासून त्याच्या मठात राहत होती. आपण लहान मुलांवर प्रयोग करीत असल्याचा दावा या भोंदूने केला होता. त्यानुसार त्याने सहावेळा अघोरी प्रकार केलेत. सातवा प्रकार करताना या भोंदूचा प्रकार उघड झाला.
४ फेब्रुवारी ९ बाय ९ आकाराचा खड्डा काढला. त्यामध्ये तिला पुरण्यात आले. २५ फेब्रवारी या भोंदूने मुलीला पुरलेल्या खड्ड्यावर लाकडे रचली आणि ती पेटवली. महाशिवरात्री या दिवशी मुलगी पुन्हा जिवंत असल्याचा त्यांने दाखविण्याच डाव रचला होता. त्याचवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी धाड टाकली त्यावेळी हा प्रकार उघड झाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.