www.24taas.com, नवी दिल्ली
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी नवा शोध लावला आहे. सुंदर मैत्रीण आणि मोबाईलमुळे अपघात घडत आहेत. देशातील वाढत्या अपघाताचे कारण हेच आहे, असे वक्तव्य केले आहे.
एका वैद्यकीय महाविद्यालयात रस्ता सुरक्षा विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलताना रमन सिंह बोलत होते. त्यावेळी हे वक्तव्य केले. आपल्या जवळ चांगली मोटारसायकल, मोबाईल आणि सुंदर मैत्रीण असेल तर अपघात ठरलेलाच असेल. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांपैकी ६० टक्के हे युवक असतात. दुचाकी चालविताना युवक अनेकवेळा मोबाईलवर बोलताना दिसतात. त्यामुळे दुर्घटना होतात.
हजारो रूपये खर्च करून मोटारसायकल घेतली जाते. मात्र, काही रुपये खर्च करून हेल्मेट घेतले जात नाही. त्यातच सुंदर मैत्रीनेमुळे अपघातांत वाढ होत आहे, असे सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, याआधी बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्यांने महिलांना मोबाईल वापरण्यास देऊ नये, असे म्हटले होते. तर हरियाणातील खाप पंचायतींनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांना महिलांनाच दोषी ठरविले आहे. आता एक पाऊल पुढे टाकून भाजप नेते रमन सिंह वादग्रस्त वक्तव्य केले आहे.