www.24taas.com, नवी दिल्ली
योग गुरू बाबा रामदेव आपलं उपोषण आज समाप्त करणार आहेत. काळ्या धनाविरोधात बाबांनी रामलीला मैदानावर सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. सकाळी ११ वाजता आपण या उपोषणाला पूर्णविराम देण्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केलीय.
लोकसभा निवडणूक २०१४ च्या अगोदर काँग्रेसविरुद्ध मोठं आंदोलन सुरू करणार असल्याची, घोषणा बाबा रामदेव यांनी केलीय. काल (सोमवारी) बाबा रामदेव यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. आंबेडकर स्टेडियम रात्र काढल्यानंतर बाबा रामदेव यांनी आपण आपल्या समर्थकांच्या सांगण्यावरून उपोषण समाप्त करत असल्याचं म्हटलंय. काल रात्री बाबांच्या समर्थकांसाठी जेवण-पाणी उपलब्ध झालंय.
हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं यावेळी बाबा रामदेव यांनी सांगितलंय. आज दुपारआधी आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असणार आहे, याची ते घोषणा करणार आहेत.
आंबेडकर स्टेडियम रिकामं करण्याच्या पोलिसांच्या सूचनेला काल बाबांनी धूडकावून लावलं होतं पण संध्याकाळी उशीरा आंबेडकर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहणाचा समारंभ लक्षात घेऊन बाबांनी स्टेडियम खाली करण्याचा निर्णय घेतलाय. लाल किल्ला स्टेडियमच्या बाजुलाच आहे.