www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात. शुक्रवारी निवडणूक आयोगानं या पाचही राज्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. पाचही राज्यांत आचार संहिता आत्तापासूनच लागू झाल्याचंही आयोगानं घोषीत केलंय. या निवडणुकीत पहिल्यांदाच ‘ईव्हीएम’ मशीनवर `नन ऑफ द अबाऊव्ह` (NOTA) हे बटन असणार आहे. याचाच अर्थ याच निवडणुकांपासून ‘राईट टू रिजेक्ट’ ईव्हीएम मशीनवरदेखील उपलब्ध असेल. या विधानसभा निवडणूकीत एकप्रकारे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी ‘सेमी फायनल’ची नांदीच पाहायला मिळणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त बी. एस. संपत यांनी पाचही राज्यांतील निवडणुकांच्या तारखा घोषीत केल्या. दिल्ली, राजस्थान, मिझोराम आणि मध्यप्रदेशमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका पार पडतील तर छत्तीसगडमध्ये मात्र दोन टप्प्यांत निवडणुका घेण्यात येतील.
दिल्ली आणि मिझोराममध्ये ४ डिसेंबरला मतदान होईल... तर मध्यप्रदेशमध्ये २५ नोव्हेंबर रोजी, राजस्थानमध्ये १ डिसेंबर रोजी मतदान होईल. छत्तीसगडमधलं पहिल्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी १९ नोव्हेंबरला मतदान पार पडेल. सर्व राज्यातील मतमोजणी रविवारी, ८ डिसेंबर रोजी होईल.
एकूण ६३० विधानसभा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत ११ कोटी मतदार मतदार आहेत. या मतदारांच्या सोईसाठी एकूण एक लाख ३० हजार मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. ‘इव्हिएम’ मशीनद्वारेच हे मतदान पार पडेल. पण, या निवडणुकांचं वैशिष्ट्यं म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदा ‘नन ऑफ द अबाऊव्ह’ म्हणजेच NOTA चं बटन इव्हीएम मशीनवर उपलब्ध असेल.
पेड न्यूज तसेच निवडणुकासाठी होणाऱ्या खर्चावर निवडणूक आयोगाचं लक्ष असेल. तसंच या निवडणुकीत पहिल्यांदाच विशेष जागरुकता पर्यवेक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. फोटो ओळखपत्र बनविण्याची सारी कामं पूर्ण झाली असून वोटर आयडी स्लीप’ घरपोच मिळेल असं आयोगानं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.