जाणून घ्या: कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या 10 गोष्टी

डॉ. एपीजे अब्दुल कलाम ज्यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखवणारे राष्ट्रपती म्हणून राहतील. 

Updated: Jul 28, 2015, 04:30 PM IST
जाणून घ्या: कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या 10 गोष्टी  title=

नवी दिल्ली: डॉ. एपीजे अब्दुल कलाम ज्यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखवणारे राष्ट्रपती म्हणून राहतील. 

शिलाँग इथं सोमवारी संध्याकाळी डॉ. कलाम यांचं निधन झालं. तेव्हा सुद्धा ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचं काम करत होते. डॉ. कलाम यांचं संपूर्ण आयुष्य आदर्श आहे. 

त्यांच्याबद्दल सामान्यपणे माहिती नसलेल्या या 10 गोष्टी जाणून घ्या...

1. देशाचे राष्ट्रपती होण्यापूर्वी डॉ. कलाम हे एका खोलीच्या फ्लॅटमध्ये राहत होते आणि देशाच्या आघाडीच्या संरक्षण तंत्रज्ञानासाठी नव्या शोधाचं काम करत होते. 

2. डॉ. कलाम यांच्या लहानपणी त्यांचे सर्वात जवळचे तीन मित्र होते. रामानंद शास्त्री, अरविंदम आणि शिवप्रकसन... हे तिन्ही जण हिंदू ब्राह्मण कुटुंबातील होते. 

3. रामेश्वरम मंदिरातील प्रमुख लक्ष्मण शास्त्री हे डॉ. कलाम यांच्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते. 

4. डॉ. कलाम यांना कर्नाटक संगीत आणि एमएस सुब्बलक्ष्मी यांच्याबद्दल खूप आदर होता. कर्नाटक संगीत त्यांना खूप आवडायचं. सुब्बलक्ष्मी स्वत: आपल्या हातांनी जेवण बनवून डॉ. कलाम यांना वाढायच्या. त्यावेळी जेवतांना ते अगदी पारंपरिक पद्धतीनं म्हणजे खाली जमिनीवर बसून केळीच्या पानात जेवायचे. 

5. डॉ. कलाम यांना दाक्षिणात्य पदार्थ विशेष करून इडली खूप आवडायची. 

6. जेव्हा डॉ. कलाम यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी निवडलं गेलं. तेव्हा शपथविधी कार्यक्रमाला त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत विमान प्रवासाचे तिकीट उपलब्ध होते. पण डॉ. कलाम हे असे व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या पदाचा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापर केला नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांना सेंकड एसी रेल्वेनं दिल्लीला शपथविधीसाठी आणलं. 

7. एकदा एका दीक्षांत समारंभात राष्ट्रपती डॉ. कलाम यांची खूर्ची इतर खूर्च्यांपेक्षा वेगळी आणि मोठी होती. त्यामुळं त्यांनी त्या खूर्चीवर बसण्यास नकार देत, साध्या खूर्चीवर ते बसले होते. 

8. एकदा कलाम यांनी फुटलेली काच इमारतीला बसवायला नकार दिला होता. ती फॅशनसाठी होती. पण त्यामुळं पक्ष्यांना नुकसान झालं असतं, असं सांगत कलाम यांनी हा सल्ला नाकारला होता. 

9. एकदा 400 विद्यार्थ्यांसमोर बोलत असतांना अचानक लाईट गेले. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात कुठेही बाधा न येऊ देता डॉ. कलाम संपूर्ण विद्यार्थ्यांच्यामधून रांगेत फिरले आणि आपली चर्चा कायम ठेवली. 

10. राष्ट्रपती बनल्यानंतर केरळच्या राज भवनात डॉ. कलाम यांनी सर्वात पहिल्यांदा निमंत्रित केलेले पाहूणे म्हणजे रस्त्यावर काम करणारा एका चांभार आणि छोट्या रेस्टॉरंटचा मालक. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.