नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रसिद्ध 'एम्स' हॉस्पीटलच्या एका महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे अनेकांना चांगलाच धक्का बसलाय. 'एम्स'च्या ३१ वर्षीय महिला डॉक्टरनं समलैंगिक पतीनं केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय.
संबंधित, दाम्पत्याचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता. हे दोघेही एम्स हॉस्पीटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होते आणि हॉस्पीटलच्या परिसरातच राहत होते.
विवाहानंतर काही दिवसांतच आपला पती समलैंगिक असल्याचं महिला डॉक्टरला समजलं होतं. परंतु, हे सत्य आपण तेव्हा स्वीकारलं होतं... आणि त्यासोबतच जगण्याची तयारीदेखील केली होती, असा दावा महिला डॉक्टरनं आपल्या सुसाईड नोटमध्ये केलाय.
परंतु, पतीनं वारंवार केलेल्या प्रतारणेमुळे अखेर कंटाळून आपण आत्महत्येचा निर्णय घेतल्याचंही या महिला डॉक्टर महिलेनं म्हटलंय.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्समध्ये अनेस्थिस्स्ट असलेल्या प्रिया वेदी हिचा मृतदेह पहाडगंजच्या एका हॉटेलमध्ये सापडला. तिची हाताची नस कापलेली होती. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर शनिवारपासून ती या हॉटेलमध्ये थांबली होती.... घटनास्थळी प्रियानं लिहिलेली सुसाईड नोटही सापडली. शनिवारी दुपारपासून प्रियानं टाकलेल्या फेसबुक पोस्टवरून पती समलैंगिक असल्यानं या दाम्पत्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं उघड होत होतं.
सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी एम्सचा त्वचा रोग तज्ज्ञ आणि प्रियाचा पती कमल वेदी (३४ वर्ष) याला अटक केलीय.
कमल वेदी याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ ए (क्रूरता) आणि ३०४ बी (हुंड्यासाठी छळ आणि मृत्यू) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.