www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भारताचा नकाशाच बदलून टाकला आहे. काश्मीरला पाकव्याप्त पाकिस्तानात दाखविला आहे. हा नकाशा त्यांनी `आप`च्या संकेतस्थळावर टाकला टाकला आहे. त्यामुळे `आप` ची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, `आप` ने तात्काळ हा नकाशा आपल्या साईटवरून हटविला आहे.
भारताचा अविभाज्य भाग असलेले पाकव्याप्त काश्मीर आम आदमी पक्षाने थेट पाकिस्तानला देऊन टाकले आहे. `आप`च्या संकेतस्थळावर तसे स्पष्टपणे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे `आप` च्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.
`आप` ला देणगी देणाऱ्यांची यादी पक्षाने वेबसाइटवर टाकली आहे. ही माहिती देणाऱ्या पेजवर `आप` ने भारताचा नकाशाही टाकला असून त्या नकाशातून पाकव्याप्त काश्मिर काढून टाकण्यात आले आहे. या नकाशाच्या खाली @ AAP2014 ट्विटर हँडलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र, हा खुलासा कोणी केलाय ते अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे शंका उपस्थित करण्यात येत आहे.
काश्मीरबाबत आम आदमी पक्षाची भूमिका संदिग्ध आहे. प्रशांत भूषण यांनी यापूर्वी काश्मीरमधून सैन्य काढून घ्या आणि काश्मिरींना भारतात राहायचे की नाही हे जाणून घेण्यासाठी सार्वमत घ्या, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे या नकाशावरून आता वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, आपली चूक लक्षात येताच हा नकाशा संकेतस्थळावरून हटविण्यात आला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.