जयपूर : एका ६४ वर्षाच्या व्यक्तीला फक्त २७ वर्षांची तरूणी आवडली. हे साधेसुधे प्रेमप्रकरण नाही. हे प्रकरण आहे शिक्षक आणि विद्यार्थीनी यांच्यातील लव्ह स्टोरीचं. दोघांच्या वयामध्ये इतके अंतर आहे की मुलीचे पालक यासाठी तयार होत नाही आहेत. मुलीने घरच्यांची परवानगी न घेताच लपूनछपून शिक्षकाशी लग्न देखील केले. मात्र जेव्हा मुलीच्या घरच्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला.
जेव्हा हे दोघे मॅरेज सर्टिफिकेट घ्यायला रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा मुलीच्या पालकांनी त्यांना घेरले. घरातील लोकांनी प्रोफेसरला रस्त्यातच बेदम मारायला सुरवात केली. मुलीने अडवण्याचा प्रयत्न केला पण कोणी काहीच एकायला तयार नव्हते. यादरम्यान मुलीची एक मैत्रीणदेखील प्रोफेसरना वाचवायला आली पण तिचेदेखील कोणी ऐकले नाही. दोन्ही मुली प्रोफेसरला कश्याबश्या गर्दीतून बाजूला घेऊन गेल्या. मात्र मुलीचे पालक त्यांचा मागोवा घेत होते.
पालकांचे म्हणणे असे होते की या दोघांचे प्रेमाखातर लग्न झालेले नाही तर त्यांच्या मुलीने पैशांची हाव असल्याने लग्न केले आहे. मात्र मुलीने तिच्या पालकांवरच आरोप केलाय की त्यांना माझे सुख कधीच बघवत नाही आणि ते कायमच माझ्याशी वाईट वागले आहेत. आज मी पहिल्यांदा माझ्या पसंतीचे काही केले आहे तर ते ही त्यांना बघवत नाही आहे.