www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
९० टक्के भारतीयांचा मोदींना विरोध आहे, असं म्हणणं आहे प्रसिद्ध गीतकार आणि राज्यसभेचे खासदार जावेद अख्तर यांचं... त्यांच्या मते भारताचे भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना ९० टक्के लोकांनी नापसंत केलंय. नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलल्यामुळं आपल्याला अश्लील मॅसेज येत असल्याची तक्रारही जावेद अख्तर यांनी केलीय.
नरेंद्र मोदींना विरोध करणं म्हणजे देशविरोधी कारवाई असल्याचं अनेक जण मानतायेत, यावरही जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतलाय.
सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर आज जावेद अख्तर यांनी ट्विट केलंय, “काही मुर्ख लोक मला समजावत आहेत की, नरेंद्र मोदींना विरोध करणं म्हणजे देशविरोध कारवाई करण्यासारखं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे का ९० टक्के भारतीय देशविरोधी आहेत.”
मागील महिन्यात पाटणामध्ये जावेद अख्तर यांनी मोदी हे चांगले पंतप्रधान होऊ शकत नाही, असा दावा केला होता. कारण मोदींचा लोकशाहीवर विश्वास नाही, असं अख्तर म्हणाले होते. मोदी आपल्या मंत्र्यांसोबत नोकरासारखा व्यवहार करतात, असा आरोपही त्यांनी मोदींवर केला होता. त्यामुळं पुन्हा एकदा आता या वादाला तोंड फुटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.