मुंबई : भविष्य निधी म्हणजेच पीएफ खातेधारकांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं एक खुशखबर दिलीय... बंद पडलेल्या पीएफ खात्यांवरही यापुढे व्याज मिळणार आहे.
इपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजनं हा निर्णय घेतलाय. यानुसार, गेल्या ३६ महिन्यांपासून (३ वर्षांपासून) कर्मचारी किंवा कंपनीकडून पीएफची रक्कम टाकली गेली नसेल म्हणजेच जी खाती निष्क्रीय असतील त्या खात्यांनाही व्याज सुरूच राहणार आहे.
१ एप्रिलपासून हा नियम लागू होणार आहे. श्रममंत्री बंडारु दत्तात्रय यांनी ही माहिती दिलीय.
काँग्रेस नेतृत्वाखाली सत्तेवर असलेल्या 'यूपीए - २' सरकारच्या कार्यकाळात २०११ साली निष्क्रीय खात्यांवर व्याज न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे कर्मचारी खात्यांमधून पैसे काढून घेतील किंवा हे खाते सक्रीय खात्याशी जोडतील, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
सलग नोकऱ्या बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. २०१५-१६ च्या इकोनॉमिक सर्व्हेनुसार एकूण १५ करोड पीएफ खात्यांपैंकी जवळपास ९ करोड खाते निष्क्रीय आहेत. यामध्ये, जवळपास ४४ हजार करोड रुपयांहून अधिक रक्कम जमा असू शकते.