'आणीबाणी'ची चाळिशी : 'राष्ट्रपतीजी ने आपातकाल की घोषणा की है...'

२५ जून १९७५... याचदिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज ४० वर्षं  पूर्ण झालेत. आणीबाणीच्या त्या काळ्या अध्यायाच्या आठवणींना उजाळा देणारा, आमचा हा खास रिपोर्ट...

Updated: Jun 25, 2015, 11:15 AM IST
'आणीबाणी'ची चाळिशी : 'राष्ट्रपतीजी ने आपातकाल की घोषणा की है...' title=

नवी दिल्ली : २५ जून १९७५... याचदिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज ४० वर्षं  पूर्ण झालेत. आणीबाणीच्या त्या काळ्या अध्यायाच्या आठवणींना उजाळा देणारा, आमचा हा खास रिपोर्ट...

२५ जून १९७५... 'भाइयों और बहनों, राष्ट्रपतीजी ने आपातकाल की घोषणा की है...' देशातल्या लोकशाहीचा गळा घोटणारा हा आवाज होता तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींचा... 

२५ जून १९७५ च्या रात्री अवघ्या देशानं हा आवाज ऐकला... या संदेशानंतर स्वतंत्र भारतात लोकशाही संपुष्टात आली आणि पहिल्यांदाच हुकूमशाहीचं, दडपशाहीचं सत्र सुरू झालं. २६ जून १९७५ ची पहाट उजाडली ती विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांना अटक झाल्याच्या बातमीनं.

जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर आणि त्यावेळचे जनसंघाचे अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांना आणीबाणीचे कैदी बनवून तुरूंगात डांबण्यात आलं.


इंदिरा गांधी

आणीबाणी लागू करण्याची वेळ इंदिरा गांधींवर का आली? 
त्यावेळी आयर्न लेडीची लोकप्रियता हळुहळु वितळू लागली होती. बांगलादेशी शरणार्थींच्या समस्येनं डोकं वर काढलं. महागाई आणि भ्रष्टाचारामुळं इंदिरा सरकारच्या विरोधात आवाज बुलंद होऊ लागला. इंदिरा गांधींचा गरीबी हटावचा नारा खोटा ठरला होता... 

उत्तर भारतात विद्यार्थी संघटनांनी आंदोलनं सुरू केली... त्याचं नेतृत्व करत होते जयप्रकाश नारायण... जेपींनी इंदिरा सरकारच्या विरोधात संपूर्ण क्रांतीची घोषणा केली होती. पण आणीबाणीचं नैमित्तिक कारण ठरलं ते १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद हायकोर्टानं दिलेला निकाल... 

रायबरेली लोकसभा मतदारसंघातून इंदिरा गांधींची खासदारकी रद्द करण्याचा ऐतिहासिक फैसला हायकोर्टानं सुनावला... पण त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. २५ जून १९७५ रोजी सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा दिला. त्यांची खासदारकी कायम राहिली, पण मतदानाचा अधिकार त्यांना नव्हता. त्याचदिवशी दिल्लीच्या रामलीला मैदानात जेपींनी नवा नारा दिला... 'सिंहासन छोडो, जनता आती है...'

आता आपली सत्ता टिकणार नाही, याची इंदिरा गांधींना खात्री झाली. त्यांनी आपल्या खासगी सचिवामार्फत तत्कालिन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्याकडं तातडीनं आणीबाणीचा अध्यादेश पाठवला. राष्ट्रपतींनी त्यावर तत्काळ स्वाक्षरी केली. कागदाच्या या तुकड्यानं देशात आणीबाणी लागू झाली.

देशात आणीबाणी लागू झाली. २५ जून १९७५ ची ती काळरात्र देशात अंधःकार घेऊन आली. त्या रात्रीनंतर लोकशाहीच्या प्रकाशाचा सूर्य उगवायला तब्बल २१ महिने वाट पाहावी लागली.
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.