बारा कोटी युवा मतदार; 'मॅजिक फिगर' बदलणार देशाचं भविष्य?

२०१४ सालच्या आगामी लोकसभा निवडणुकीत तब्बल १२ कोटी नवीन युवा मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 4, 2013, 08:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
२०१४ सालच्या आगामी लोकसभा निवडणुकीत तब्बल १२ कोटी नवीन युवा मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला एकूण १२ कोटी मते मिळाली नव्हती. त्यामुळे १२ कोटी नव्या मतदारांची ही संख्या लक्षात घेता येत्या निवडणुकीत ती निश्चितपणे `मॅजिक फिगर` ठरणार आहे.
दर पाच वर्षांनी भरणारा लोकशाहीचा उत्सव उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. यूपीए सरकारने आपला कार्यकाल पूर्ण केला तर 2014 च्या एप्रिल-मे महिन्यात आगामी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी १८ वर्षांची वयोमर्यादा पार केलेल्या जवळपास १२ कोटी नव्या मतदारांनी नोंदणी केलीय.
२००९ सालच्या गेल्या निवडणुकीत देशभरात सुमारे ७९ कोटी मतदारांची नोंद झालेली होती. त्यात आता नव्या १२ कोटी युवा मतदारांची भर पडलीय. गेल्या लोकसभा निवडणुकीत कुणाही एका राजकीय पक्षाला १२ कोटींच्या आसपास मते मिळालेली नव्हती. अगदी सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षालाही ११.९ कोटी मतदारांनीच कौल दिला होता. भाजपला ७.८ कोटी, बसपला २.६ कोटी तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला २.२ कोटी मतदारांनी मतदाने केले होते. अन्य कुणाही राजकीय पक्षाला एक कोटींपेक्षा जास्त मते मिळाली नव्हती.
ही आकडेवारी लक्षात घेतली तर नव्या १२ कोटी मतदारांची पॉवर किती महत्त्वाची ठरणार आहे, ते लक्षात येते. नव्या मतदारांपैकी सर्वाधिक २.३ कोटी मतदारांची नोंद देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक महत्त्व असलेल्या उत्तर प्रदेशात झालीय. यूपीतील १२.९ कोटी मतदारांच्या तुलनेत नव्या मतदारांची संख्या १७.६ टक्के इतकी आहे. सर्वाधिक नवीन मतदार नोंदणी महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतोय. महाराष्ट्रात १.०५ कोटी नव्या मतदारांची नोंद झाली असून, राज्यातील एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण १३.२ टक्के इतके आहे. बिहारमध्ये ९० लाख, आंध्र प्रदेशमध्ये ८० लाख, मध्य प्रदेशात ७४ लाख, राजस्थानात ७० लाख आणि तामिळनाडूत ६२ लाख नव्या मतदारांची नोंदणी झालीय. जगामध्ये असे अनेक देश आहेत, ज्यांच्या एकूण मतदारसंख्येपेक्षा भारतातील नवीन मतदारांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे.

त्यामध्ये भूतान, बारबाडोस, आयर्लंड, डेन्मार्क, ग्रीस, बेल्जियम यासारख्या देशांचा समावेश होतो. याचाच अर्थ दर पाच वर्षांनी एका छोट्या देशाच्या मतदारांपेक्षाही जास्त नवे मतदार भारतामध्ये नोंद होतात. निवडणूक आयोगाने मतदार यादी नोंदणीसाठी खास प्रयत्न केले. त्याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्थांनीही मतदार जागृतीसाठी `जागो मतदार जागो`सारख्या मोहिमा चालवून निवडणूक आयोगाच्या कामात हातभार लावला. १२ कोटी नव्या मतदारांची नोंद हा त्याचाच एक भाग आहे. आता पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारी ही `युवा पॉवर` कुणाच्या पारड्यात मत टाकते, यावर भारताचे भविष्य अवलंबून असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.