www.24taas.com, एएनआय, इंदूर
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे. दिग्विजय सिंग यांनी चक्क बुरखा खऱेदीची बिलं दाखवून एकच खळबळ उडवून दिली आहे.
मोदींच्या सभेला मुस्लिम मोठ्या संख्येने हजर राहिले हे दाखविण्यासाठी भाजपने ही फसवी खेळी केल्याचा आरोप दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
भाजपने हे बुरखे इंदूरमधून खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या बुरख्यांची किंमत ४४ लाख रुपये आहे. या बुरख्यांची बिलं दाखवताना दिग्विजय यांनी सांगितले की, ४४ लाखांपैकी ४२ लाख रुपये बुरखा विक्रेत्याला देण्यात आले आहेत. भाजप एतक्यावर थांबले नाही तर त्यांनी लखनऊमधून टोप्याही खरेदी केल्या आहे. या खरेदीचे बिलही सादर करणार असल्याचे दिग्विजय यांनी सांगितले.
भोपाळमध्ये उद्या बुधवारी भाजपचा महामेळावा होत आहे. या मेळाव्याला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भाजपने या मेळाव्याला ५० हजार मुस्लिम हजर राहतील, तसेच त्यात पाच हजार महिला असतील, असा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिग्विजय यांनी केलेल्या आरोपाने चांगलीच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे दिलीप बिडकॉम कंपनीचे देवेंद्र जैन यांनी ही बुरखा खरेदी केली असून ते एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे बंधू आहेत. शिवाय दिलीप बिडकॉमचा मालक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा खास माणूस आहे, असा दावाही दिग्विजय यांनी केलाय.
दरम्यान, शिवराज यांनी मात्र दिग्गीराजांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. दिग्विजय चुकीची पावती दाखवत असल्याचे नमूद करताना त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.