‘सैनिक हे शहीद होण्यासाठीच असतात’

‘सैनिक हे शहीद होण्यासाठीच असतात’ असं वातावरण प्रक्षोभक करणारं वक्तव्य बिहारचे नगरविकास मंत्री भीम सिंह यांनी गुरुवारी केलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 8, 2013, 03:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
‘सैनिक हे शहीद होण्यासाठीच असतात’ असं वातावरण प्रक्षोभक करणारं वक्तव्य बिहारचे नगरविकास मंत्री भीम सिंह यांनी गुरुवारी केलं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेल्या सडेतोड टीकेमुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर या मंत्रिमहोदयांना माफिनामा सादर करावा लागला.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी धारेवर धरल्यानंतर भीम सिंग यांनी आपल्या वक्तव्याची देशवासियांकडे माफी मागितली. ‘आपल्या वक्तव्यावरून उडालेल्या खळबळीबाबत आपल्याकडे काहीच माहिती नव्हती... याबद्दल मी अनभिज्ञ होतो... मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर त्यांच्याकडूनच मला ही गोष्ट कळली’ असं कारण देत त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली. सोबतच मीडिया आपलं वक्तव्यं तोडून-मोडून सादर करत असल्याचं सांगण्यास ते विसरले नाहीत.

बुधवारी पाटणा विमानतळावर शहीद सैनिकांच्या सन्मानार्थ एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं होतं. ‘जवान हे शहीद होण्यासाठीच असतात. तरुण सेनेत आणि पोलीसमध्ये नोकरी का करतात? शहीद होण्यासाठीच ते हा पेशा स्विकारतात’ असं त्यांनी पत्रकारांसमोर म्हटलं.
दरम्यान, बिहार सरकारनं शहिदांच्या कुटुंबीयांना १०-१० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केलीय. राजकीय सन्मानासहीत शहिदांवर अंत्यसंस्कार पार पडलेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.