www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख खूनी पंजा असा केल्याबद्दल निवडणूक आयोगानं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना नोटीस बजावलीये. १६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयोगानं दिलेत. मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसनं आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली होती.
निवडणूक आयोगाच्या नोटीसनुसार जर मोदींनी दिलेल्या वेळेत नोटीशीला उत्तर दिलं नाही तर मोदींना याबाबत काही बोलायचं नाही, असं समजल्या जाईल. मग निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल, असं म्हटलंय.
छत्तीसगढच्या राजनांदगावला ७ नोव्हेंबरला झालेल्या मोदींच्या भाषणाची एक सीडी आयोगाला मिळालीय. या भाषणात मोदी म्हणाले होते, की “राज्यात खूनी पंजाची सावली पडू नये असं वाटत असेल तर काँग्रेसला मतदान करुन नका. चुकूनही छत्तीसगढला ‘जालीम पंजा’च्या हातात जावू देऊ नका.”
यापूर्वी निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांच्या मुजफ्फरनगर दंगलीवर केलेल्या वक्तव्यावर नोटीस बजावली होती. राहुल गांधींनी इंदूर इथं एका सभेत आयएसआयनं दंगलीतील पीडित तरुणांसोबत संपर्क साधल्याचं म्हटलं होतं. यावर निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त केली होती आणि पुढं काळजी घेण्याचा सल्लाही दिला.
भाजपनं राहुल गांधी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याचप्रमाणं आता काँग्रेसनं मोदींची तक्रार केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.