www.24taas.com,नवी दिल्ली
मायदेशातील मालिकापराभवांमुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका होत असली तरी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने धोनीची पाठराखण केली आहे. कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी धोनी हाच एकमेव सक्षम खेळाडू भारताकडे आहे. मात्र धोनीने ट्वेन्टी-२० कर्णधारपदाचा भार हलका करावा, असा सल्लाही द्रविडने धोनीला दिला आहे.
कसोटीत नेतृत्व सांभाळण्यासाठी धोनी सक्षम असून चांगली कामगिरी करण्याची क्षमताही त्याच्यात आहे. एका वेळी सर्वच भूमिका तो पार पाडू शकणार नाही. त्यामुळे गरज असल्यास त्याने सहकाऱ्यांची मदत घ्यावी. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने खेळत राहावे.
पण ट्वेन्टी-२० आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधारपदाचा त्याने त्याग करावा, असे मला वाटते. त्यामुळे कर्णधारपद, यष्टिरक्षक आणि सततच्या क्रिकेट खेळण्यापासून त्याला विश्रांती मिळू शकेल. असे केल्यास, त्याला आपल्या मुख्य भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळेल. त्याचबरोबर विराट कोहलीलाही भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सांभाळण्याची संधी मिळेल. त्याच्याकडून कशी कामगिरी होतेय, हेसुद्धा आपल्याला समजेल.