मुंबई : भारतात सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार विवाहासाठी मुलींचं योग्य वय १८ तर मुलांचं २१ वर्ष आहे. परंतु, एखादा विवाह दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विवाहाचं कोणतं वय योग्य आहे बरं...?
याच प्रश्नाचं उत्तर शोधून काढलाय उटाह यूनिर्व्हर्सिटीच्या निकोलस वोलफिंगर या संशोधकानं... एखाद्या चिरस्थायी लग्नासाठी कोणत्या वयात मुला-मुलींचा विवाह होणं योग्य आहे, याचा उलगडा निकोलस यांनी आपल्या संशोधनातून केलाय.
२००६ ते २०१० दरम्यान 'नॅशनल सर्व्हे ऑफ फॅमिली ग्रोथ' (NSFG) मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर निकोलस यांनी आपलं मत मांडलंय.
२८ ते ३२ व्या वर्षात विवाह केलेल्या जोडप्यांची विभक्त होण्याची संख्या सर्वात कमी होती, असं निकोलस यांनी म्हटलंय.
विवाहाचं योग्य वय कोणतं या प्रश्नावर अँऩ्ड्यू मार्शल (मॅरीटल थेरिपिस्ट) यांनी मात्र, 'जेव्हा तुम्हाला दोघांनाही विवाहासाठी तयार असाल ते वय योग्य' असं म्हटंलय.
विवाह की लिव्ह इन
लग्न ही एक चांगली संस्था आहे. कारण, एकत्र राहणं हा एक खासगी करार असतो तर विवाहबंधनात अडकणं हा एक सार्वजनिक करार असतो. यामुळे, तुमचा पार्टनर तुमच्याच कुटुंबाचा एक भाग बनतो... आणि प्रत्येकाला आणखीन एक प्रेमळ सपोर्ट मिळतो.
याशिवाय, लग्नामुळे तुम्ही वेगळं होण्यापूर्वी आपल्या निर्णयाचा दोन वेळा तरी विचार करता... आणि तुमच्या नात्यासाठी हे चांगलं आहे.
सोशल मीडिया आणि नातेसंबंध
मार्शल यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडिया हा तुमच्या नात्यासाठी सर्वात मोठा अपायकारक घटक आहे. दहा वर्षांपूर्वी आपला पार्टनर नेहमी सोशल मीडियावर, फोनवर असतो अशी तक्रार करत नव्हतं. शिवाय, व्याभिचारासाठीही हा एक सोप्पा प्लॅटफॉर्म असतो, असंही मार्शल यांना वाटतंय.