www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कडाक्याच्या थंडीत तुमच्यामुळे डोळ्यांची आग होते का? तुम्हाला अंधुक दिसतं का? किंवा डोळ्यांना अन्य काही त्रास होतोय का? तुमचं उत्तर हो असेल तर या त्रासाला निष्काळजीपणे मागे टाकू नका... बऱ्याचदा कडाक्याच्या थंडीत अशा समस्यांना आपल्याला सामोर जावं लागतं. ‘ड्राय-आय सिंड्रोम’ नावाच्या आजाराची ही लक्षणं असू शकतात.
थंडीपासून संरक्षणासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. मात्र, डोळ्यांची काळजी घ्यायला विसरतो. तज्ज्ञांच्या मते, आपल्या डोळ्यांच्या बाहेरच्या बाजुला द्रव स्वरूपाचा पातळ थर असतो. जो आपल्या डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. हिवाळ्यात अती थंडीमुळे, उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा ऑफिसमध्ये कम्प्युटरवर सलग डोळे रोखून धरल्यानं ‘ड्राय- आय सिंड्रोम’ म्हणजेच डोळे कोरडे पडण्याची लक्षणं दिसू लागतात.
डोळ्यांचा कोरडेपणा तुम्हाला त्रासदायक ठरु शकतो. जर आपण खूप वेळ कम्प्यूटरवर काम करत असाल तर थोड्या-थोड्यावेळाने एका मिनिटासाठी का होईना पण डोळ्यांना विश्रांती द्यायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘आय-ड्रॉप’ दिवसांतून दोन-तीन वेळा डोळ्यांत टाकू शकता.
अमेरीकेतील एका पाहणीनुसार, ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या जवळपास ३२ लाख स्त्रिया आणि १७ लाख पुरुष ‘ड्राय-आय सिंड्रोम’चे बळी ठरले आहेत... त्यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्यांकडे दुर्लक्ष न केलेलंच बरं!
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.