www.24taas.com, बंगळुरू
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झालीय. साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.
२२४ पैकी २२३ जागांचा निकाल आज लागणार आहे. एका जागेवर भाजपा उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं या जागेवरील निवडणूक रद्द करण्यात आली होती. मुख्य लढता आहे ती काँग्रेस आणि भाजपमध्ये... परंतू काही जागांवर जनात दल सेक्युलर आणि येडियुरप्पा यांच्या पक्षानंही निवडणुकीला रंगत आणलीय.
भाजपची सत्ता असलेलं दक्षिणेतील कर्नाटक हे एकमेव राज्य आहे. मात्र येडियुरप्पा यांनी भाजप सोडून कर्नाटक जनता पार्टी स्थापन केल्यामुळं भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळं पुन्हा सत्ता राखण्याचं आव्हान भाजप समोर आहे. तर येडियुरप्पांकडे भाजपच्या मतांचे ध्रुवीकरण होणार असल्यानं काँग्रेसच्या सत्तेत येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, जेडीएसचाही या निवडणुकीत प्रभाव वाढल्यानं राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची चिन्ह आहेत. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचा केजेपी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फारशी कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळं या विधानसभा निवलडणुकीत केजेपीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष आहे. हा येडियुरप्पांच्या अस्तित्वाचा लढा मानण्यात येतोय. मराठी जनता आणि नेत्यांमध्ये एकजूट झाल्यानं बेळगावमध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीला किती जागा मिळणार याकडे सा-या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.