[caption id="attachment_1769" align="alignleft" width="150" caption="अनंत गाडगीळ, काँग्रेस प्रवक्ते"][/caption]
अनंत गाडगीळ प्रवक्ते, क़ॉंग्रेस
अण्णा हजारे यांच्यसारख्या ज्येष्ठ समाजसेवकांचा मी व माझा कॉंग्रेस पक्ष हा आदरच करतो. त्यांनी सुरू केलेला लढा नक्कीच प्रेरणादायी आहे. या लढ्याला फार मोठ्या प्रमाणात देशभरातून पाठींबा मिळतो आहे. अण्णांचा व्यक्तीगत जीवन अत्यंत स्वच्छ आहे, हे सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आहे.
भ्रष्टाचार ही या देशाला लागलेली किड आहे. शासनातील अधिकारी ते अनेक राजकारणी यामध्ये गुंतलेले आहेत. अशा लोकांना कॉंग्रेस कधीच पाठीशी घालणार नाही. आणि आजपर्यंत तसं झालं देखील नाही. ज्यांचावर असे आरोप सिद्ध झाले आहेत अशा लोकांना पक्षाने त्याच्यां पदावरून पायउतार होण्यास भाग पाडलं आहे. परंतु, अण्णांनी आता आपल्या आंदोलनाची दिशाच बदलल्यासारखी वाटते आहे. कारण की, आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला माझा आक्षेप नाही असं म्हणणाऱ्या अण्णांनी आज मात्र उघड उघडपणे कॉंग्रेसलाच विरोध करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मनात शंकेची पाल नक्कीच चुकचुकते.
[caption id="attachment_1793" align="alignleft" width="300" caption="टीम अण्णांचा अण्णांना विळखा"][/caption]
अण्णा हे स्वत: स्वच्छ चरित्राचे आहेत याबाबत दुमत असू शकत नाही, परंतु टीम अण्णांबद्दल तशी खात्री अजिबात देता येणार नाही. अरविंद केजरीवाल, सुरेश पठारे, किरण बेदी यांनी अण्णांच्या भोवताली घातलेला विळखा हा अजगराच्या विळख्याप्रमाणे वाटतो. कारण की या लोकांनी अण्णांचा एकाप्रकारे वापर करण्यांचा प्रयत्न चालविला आहे. किरण बेदी यांनी भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी अण्णांचा या आंदोलनात सहभागी झाल्या. पण याच किरण बेदींनी स्वत:च्या मुलीला मेडीकलला अॅडमिशन मिळण्यासाठी उत्तरांचल मध्ये रहिवासी असल्याचा दाखला दिला. तर हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का?
लोकपाल येण्यासाठी काही काळ नक्कीच जाईल, कारण की ह्या लोकपाल विधेयकावर (Standing Committee) सर्वपक्षीय नेते ह्यावर लोकसभेत चर्चा करतील आणि त्यानंतरच यावर निर्णय होऊ शकेल. म्हणजेच काँग्रेस पक्षाला विरोध करण्यापेक्षा, सर्वपक्षीय नेते यात सहभागी आहेत. याकडे टीम अण्णा हेतूपुरःस्सर दुर्लक्ष करत आहे का ? अशीदेखील शंका येते. एकूणच अण्णांनी केलेल्या विधानाने त्यांचा आंदोलनाची दिशाच बदलल्यासारखी वाटते. आणि अण्णांसारख्या असामान्य व्यक्तीने त्यांचा भोवताली असणाऱ्या चौकडीपासून सावध राहावे नाही तर घात होण्याची दाट शक्यता आहे.
शब्दांकन – रोहित गोळे