शरीफ दौऱ्याबाबत तोंडात मिठाची गुळणी का? शिवसेनेला सवाल

पाकिस्तानचं नाव निघताच नेहमी विरोध करणारी शिवसेना आता गप्प का? पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या भारत दौऱ्याबाबत शिवसेनेच्या तोंडात मिठाची गुळणी का?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 24, 2014, 08:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाकिस्तानचं नाव निघताच नेहमी विरोध करणारी शिवसेना आता गप्प का? पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या भारत दौऱ्याबाबत शिवसेनेच्या तोंडात मिठाची गुळणी का?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.
नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीकरिता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ भारत दौऱ्यावर येणार आहेत. तरीही या दौऱ्याबाबत शिवसेनेनं अजून आपली भूमिका स्पष्ट केली नसल्यानं काँग्रेसकडून ही विचारणा करण्यात आलीय.
काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर भाजप आणि शिवसेनेने नेहमी आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानची क्रिकेट टीम आणि त्यांच्या कलावंतांनाही भारतात पाय न ठेवू देण्याची ढोंगी, मतलबी आणि संधीसाधू भूमिका शिवसेनेने वारंवार स्वीकारल्याचे देशाने बघितले आहे, असं सावंत यांनी सांगितलं.
केवळ भारत-पाकिस्तानच नव्हे तर जगातील सर्वच देशांनी द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी शक्यतोवर संवाद व सौहार्द कायम ठेवला पाहिजे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसनेही नेहमी हेच धोरण स्वीकारले.
भारताच्या नियोजित पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शपथविधीसाठी निमंत्रित करणे अजिबात गैर नाही. मात्र, हिच भूमिका काँग्रेसने घेतली असती तर भाजप व शिवसेनेचा काय युक्तीवाद राहिला असता, असा प्रश्नही श्री सचिन सावंत यांनी उपस्थित केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.