www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही चांगले काम केले. गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही जे प्रगतीचे टप्पे पार केले आहेत, यापुढेही अशीच भारताची प्रगती होत राहो, अशी आशा भारताचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.
केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार निवडून आल्यानंतर आज पंतप्रधान दुपारी राजीनामा देणार आहेत. त्यापूर्वी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी देशातील नागरिकांचे आभार मानले.
लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. जनतेच्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे. देशाने मला आतापर्यंत खूप काही दिले आहे. मला आणखी काही नको आहे. दहा वर्षांपूर्वीच्या भारतापेक्षा आताचा भारत हा खूप सक्षम झाला आहे. देशाला अजूनही देशात विकासाची गरज असून, यापुढेही देश प्रगती करत राहील, असा पुनरउच्चार त्यांनी केला.
देशाचे नेतृत्व करणे मी माझे सौभाग्य समजतो. मला विश्वास आहे, की येणारे सरकार आपल्या कामात यशस्वी ठरेल. पंतप्रधानपद सोडल्यानंतरही मला आपल्या प्रेमाची कायम आठवण राहील. मला जे काही मिळाले आहे, ते फक्त तुमच्यामुळेच मिळाल्याने ते माझ्या स्मरणात कायम राहील, असा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.