www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विजयानंतर सबका साथ, सबका विकास, असा नवा नारा देत देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडोद्यात जोशपूर्ण आणि भावपूर्ण भाषण केलं. सुरुवातीलाच त्यांनी बडोद्याच्या जनतेचे आभार मानले. आजपासून चांगले दिवस सुरू झालेत. देशातल्या जनतेसाठी शरीरातला कण न् कण आणि क्षण अन् क्षण वेचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशा विश्वास त्यांनी देशातल्या जनतेला दिला. आज नवी दिल्लीत भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, विमानतळापासून त्यांच्या `विजय`यात्रेस सुरुवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर आज नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल पोहोचलेत. मोदींची झलक मिळविण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे. अहमदाबादहून दिल्लीत दाखल झालेल्या मोदींचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, अनंत कुमार व नितीन गडकरी आदी नेत्यांनी स्वागत केले. मोदींची ही यात्रा भाजपच्या मुख्य कार्यालयापर्यंत चालणार आहे.
मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोदी भाजप कार्यालयात येणार असल्याने आज सकाळी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) जवानांनी कार्यालयाची तपासणी केली. तर दिल्लीतील आपला कार्यक्रम संपल्यानंतर मोदी सायंकाळी वाराणसीत जाणार आहेत. याठिकाणी ते गंगा आरती करणार आहेत.
या लोकसभा निवडणुकीत भाजपने 282 जागा मिळविल्या आहेत. तर एनडीएला 334 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे केंद्रात एनडीएचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले असून, मोदी सरकारचा 21 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे. मोदींनी वाराणसी आणि वडोदरा या दोन्ही मतदारसंघांतून मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. मोदी लाटेत सर्वजण धुवून निघाले आहेत. हा मोदी जल्लोष दिल्लीत ही पाहायला मिळत आहे. अनेक जण जोरदार घोषणा देत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.