`एनडीए`मध्ये राम परतणार?

एलजेपीचे अध्यक्ष रामविलास पासवान `एनडीए`त प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय. काँग्रेससोबत अनेकदा चर्चा झाली. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं भाजपचा पर्याय खुला असल्याचं रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 26, 2014, 06:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एलजेपीचे अध्यक्ष रामविलास पासवान `एनडीए`त प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय. काँग्रेससोबत अनेकदा चर्चा झाली. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं भाजपचा पर्याय खुला असल्याचं रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामविलास पासवान यांचा पक्ष लोजपा बिहारमधून सात जागांवर निवडणूक लढणार आहे. भाजपसोबतच्या आघाडीचा येत्या चार पाच दिवसांत निर्णय घेणार असल्याचं सांगत लालूंच्या आरजेडीसोबतची युती तुटली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
रामविलास पासवान यांचा पुत्र आणि लोजपा संसदीय पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान हेही यावेळी उपस्थित होते. संसदीय बोर्डातील सदस्यांची भाजपसोबत जाण्याचा पर्याय खुला ठेवण्याची मागणी होती, असं चिराग यांनी म्हटलंय.
यावेळी लालूप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राजदसोबतची आपली कटुता मात्र लपवलेली नाही. `राजदसोबत आमचं बऱ्याच काळापासून पटत नाहीए... मी तर लालूंची भेट घ्यायलाही गेलो होतो. परंतु ते जेलमधून बाहेर आल्यानंतर ताबडतोब राजद नेत्यांनी लोजपाला केवळ तीन तिकीटं देण्याची भाषा सुरू केली. त्यामुळेच जागांवर ताळमेळाचा निर्णय आम्ही काँग्रेसवर सोडला होता. आम्ही बरेच महिने वाट पाहिली पण कोणताच निर्णय झाला नाही त्यामुळे पक्षानं नव्या पर्यायांचा विचार सुरू केलाय`
भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि पासवान यांची १४ जानेवारी रोजी भेट झाली होती. २००२ साली गुजरात दंग्यानंतर रामविलास पासवान यांनी वाजपेयी सरकारमधून राजीनामा दिला होता. त्यानंतर २००४ ते २००९ पर्यंत काँग्रेस नेतृत्वाखाली यूपीए सरकारमध्ये लोजपाचाही सहभाग होता आणि पासवान केंद्रीय मंत्री होते. २००४ साली लोकसभा निवडणुकीत लोजपानं चार जागांवर विजय मिळवला होता. मात्र, २००९ साली त्यांना भोपळाही फोडता आला नव्हता... यावेळी पासवान यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.