www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले अशोक चव्हाण पुन्हा एकदा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसू लागलेत.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या औरंगाबादमधील जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्या मागेच बसले होते. पहिल्या रांगेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, तर मागच्या रांगेत अशोक चव्हाण आणि शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा बसले होते.
एव्हढंच नव्हे तर, राहुल गांधींनी आपल्या भाषणात अशोक चव्हाणांचा आवर्जून उल्लेखही केला. ते ऐकून चव्हाणही मनोमन आनंदले असतील.
आदर्श घोटाळ्यामुळे बदनाम झालेले अशोक चव्हाण यांच्यावर खटला दाखल करण्यास अलिकडेच राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. आता, काँग्रेसच्या व्यासपीठावर राहुल गांधींच्या सोबत ते दिसू लागल्यानं त्यांना पक्षानंही `क्लिन चिट` दिल्याचं मानलं जातंय.
आता नांदेडमधून अशोक चव्हाणांना काँग्रेस उमेदवारी देणार का? याकडेही सर्वांच्या नजरा लागल्यात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.