www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या आंध्र प्रदेशच्या विभाजनाला अखेर लोकसभेत मंजुरी मिळालीय. मात्र स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी लोकसभेत अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसनं यशस्वीरीत्या हे विधेयक मंजूर करून घेतलं असलं तरी आंध्र प्रदेशच्या विभाजनासारखंच आंध्रात काँग्रेसचही विभाजन होणार यात शंका नाही.
`होणार होणार...` म्हणत अखेर आंध्र प्रदेशाच्या विभाजनावर शिक्कामोर्तब झालंय. स्वतंत्र तेलंगणाला लोकसभेत मंजुरी देण्यात आलीय. मात्र, यासाठी काँग्रेसला मोठा खडतर प्रवास करावा लागला. हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच तेलंगणावरून विरोधक आणि समर्थकांनी संसदेचं कामकाज वेठीस धरलं होतं. आंध्रातल्या खासदारांनी तर लोकसभेत थेट मिरपूड फेकण्यापासून चाकू काढण्यापर्यंतचे संसदेच्या प्रतिष्ठेला लाजवणारे प्रकार केले होते. मात्र, अखेर सारे अडथळे पार करत अखेर या वादग्रस्त विधेयकाला नाट्यमयरीत्या मंजुरी देण्यात आली. विधेयक मांडतांना अभूतपूर्व गोंधळ सुरू झाल्यामुळं पुन्हा देशासमोर नाचक्की होऊ नये, यासाठी लोकसभा अध्यक्षांनी थेट लोकसभा टीव्हीचं प्रक्षेपणच बंद करण्याचे आदेश दिले. एवढंच नव्हे तर सभागृहाचे दरवाजेही बंद करण्यात आले. मात्र, या कृतीचं जेडीयू आणि टीएमसीनं तीव्र शब्दात निषेध करत आणिबाणीची आठवण करून दिली.
काँग्रेसनं दिलेला शब्द पाळल्याचं सांगत तेलंगणा विधेयक पारित करून विजयाचा अर्विभाव आणला. भाजपनं लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळं राज्यसभेतही तेलंगणा विधेयक मंजूर होण्याचा मार्ग प्रशस्त झालाय.
स्वतंत्र तेलंगणाला मंजुरी मिळाल्यानंतर तेलंगणा समर्थकांनी हैदराबादमध्ये मोठा जल्लोष केला. मात्र, सुरूवातीपासून या निर्णयाला विरोध करणाऱ्या वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींनी देशाच्या इतिहासातला हा काळा दिन असल्याचं सांगत बुधवारी `आंध्र प्रदेश बंद`ची हाक दिली आहे.
काँग्रेसनं लोकसभेत यशस्वीरीत्या विधेयक मंजूर करून घेतलंय. मात्र,पक्ष नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे ती आंध्र प्रदेशात पक्षाला सावरण्याची... कारण मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तसंच नवीन पक्ष स्थापन करण्याच्या पवित्र्यात ते आहेत. त्यामुळं आंध्राप्रमाणेच काँग्रेसचंही विभाजन अटळ दिसतंय. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला याची किंमत तर मोजावी लागणार पण आंध्र प्रदेशही काही काळ धुमसत राहणार.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.