www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज ८ मार्च... जगभरात महिला दिन साजरा होत असताना, ही आहे एका आदर्श कुटुंबाची कहाणी. एक सहा वर्षांची लहानगी मुलगी, तिची आई आणि आज्जीच्या अनोख्या ऋणानुबंधाची कहाणी. आज सगळीकडेच महिला दिन साजरा केला जातोय. महिलांना शुभेच्छा दिल्या जातायत. पण आजही महिलांविषयी सामाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आजच्या मुलींची समाजाकडून काय अपेक्षा आहे.
मुंब्रा येथील लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेत ७४ लोकांचे बळी गेले. त्यात सहा वर्षांची पुजा ठाकूर वाचली. पण तिच्या घरातील सर्वांचाच मृत्यू झाला... डोक्यावरचं छप्पर आणि आईवडिलांचा मायेचा हात कायमचा दुरावला. बिच्चारी पुजा अनाथ झाली. दुर्घटनेनंतर तिला आधी ठाण्याच्या शासकिय हॉस्पिटलमध्ये आणि तिथून सायन रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.
तब्बल नऊ तासानंतर ढिगा-याखालून तिला बाहेर काढण्यात आल्यानं पुजाच्या डोळ्यात माती गेली, तिला काही काळ दिसतही नव्हतं. सायन हॉस्पिटलमध्येच नीना कडले या परिचारिका म्हणून कामाला आहेत. अनाथ पुजाबद्दल त्यांना जेव्हा कळलं, तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला... पेशाने नर्स असलेल्या नीना कडलेंनी आधी घरच्यांशी चर्चा केली आणि नंतर सायन हॉस्पिटलच्या डीनकडे पूजाला दत्तक देण्याची विनंती केली.
नीना यांचं दोनवेळा मिसकॅरेज झालंय. त्यामुळं त्यांच्या जीवाला धोका नको, म्हणून सासूबाई सुधा कडले यांनीच आपल्या सुनेला मूल दत्तक घेण्याचा पर्याय सुचवला. इतकंच नाही तर मुलगीच दत्तक घ्यावी यासाठी प्रोत्साहन देखील दिलं.
मुलगाच हवा या हट्टापायी आजही घरातल्या सुनेला सासरकडच्यांचा जाच सहन करावा लागतो. मुलगाच हवा म्हणून आजही अनेक स्त्रियांवर गर्भपातासाठी दबाव टाकण्यात येतो, स्त्री भ्रूण हत्यादेखील केल्या जातात. मात्र, एका दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलीला दत्तक घेण्यासाठी सासरच्या मंडळींचं पाठबळ मिळावं, यासारखा दुसरा चांगला योग तो काय...? कडले कुटुंबियांचा हा आदर्श प्रत्येकजण आचरणात आणेल, तोच खरा महिला दिन म्हणावा लागेल.
मुलगी नको म्हणून ज्या समाजात आजही स्त्री भ्रूण हत्या होते त्या समाजाल एका मुलीला दत्तक घेऊन कडले कुटुंबीयांनी एक चांगली शिकवण दिलीय. त्यामुळे महिला दिना निमित्त कडले कुटुंबाच्या या दोन्हीही मातांना झी मिडियाचा सलाम.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ