EXCLUSIVE- सरबताचे ग्लास, आरोग्याला त्रास!

उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं नागरिकांचे पाय आता रसवंती गृह आणि ज्यूस विकणाऱ्या गाड्यांकडे वळू लागले आहेत. मात्र या ज्यूस विक्रेत्यांकडून स्वच्छतेची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 26, 2013, 06:52 PM IST

www.24taas.com, मुंबई
उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं नागरिकांचे पाय आता रसवंती गृह आणि ज्यूस विकणाऱ्या गाड्यांकडे वळू लागले आहेत. मात्र या ज्यूस विक्रेत्यांकडून स्वच्छतेची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. या गाड्यांवर अन्न आणि औषध प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
उन्हाचा कडाका वाढत चालल्याने नाशकात उसाचा रस आणि ज्यूस विक्रेत्यांची दुकानं थाटू लागली आहेत. साहजिकच नागरिकांचे पाय या दुकानांकडे वळू लागले आहेत. मात्र लांबून आकर्षक वाटणाऱ्या या दुकानातील स्वच्छता पाहिल्यावर भ्रमनिरास झाल्याशिवाय राहात नाही.
झी २४ तासच्या टीमने शहरातील काही हातगाड्या आणि रसवंतीगृहांना भेट दिल्यानंतर ही अस्वच्छता प्रकर्षाने दिसून आली. अनेक ठिकाणी फळं सडलेली दिसून येत होती, तर ज्या भांड्यात रस ठेवला जातो त्या भांड्यावर माशा घिरट्या घालताना दिसून येत होत्या. ज्या पाण्यापासून रस बनविला जातो ते पाणी दिवसभर उघडं असतं. ते झाकण्यासाठी कुठल्याही प्रकारची तसदी घेतली जात नाही. जो मसाला आणि साखर टाकली जाते, ती भांडीही अस्वच्छ दिसून येतात. ज्या थर्माकोल च्या खोक्यात बर्फ ठेवला जातो. त्यात बर्फाबरोबरच सायकलचा पाना, अस्वच्छ बाटली दिसून आली. त्याचा वापर कशासाठी होतो, याचं उत्तर फळ विक्रेत्यांकडे नाही त्यामुळे जे ग्राहक ठाण भागविण्यासाठी जातात त्यांना मनस्ताप सहन करवा लागत आहे.
डॉक्टर्स मात्र अशा प्रकारच्या ज्यूस आणि ज्यूस विक्रेत्यांकडे हमखास आजारांना आमंत्रण म्हणून बघतात. भर उन्हात उघड्यावरच फळांचा रस प्राशन केल्याने सर्दी खोकल्या बरोबरच पोटाचे विकारही होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाच्या फळांचा रस घेणं टाळवं. त्यापेक्षा द्राक्ष, डाळिंब, पेर अशी ताजी फळ खाण्यला प्राधान्य द्यावं, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

शहरातील प्रत्येक लहान मोठ्या रस्त्यावर अशा प्रकारची फळ ज्यूस विक्रेते आढळून येतात. मात्र त्यांच्या कडे कुठल्याही प्रकाराचा परवाना दिसून येत नाही. अन्न औषध प्रशासनाच्या वतीने नोंदणी नसणाऱ्या ज्यूस विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र त्याचा दर्जा कसा आहे त्याची तपासणी केली नसल्याही नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाच्या तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जाते.