www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
नाशिकमध्ये जात पंचायतीचं प्रकरण ताजं असताना आता कोल्हापुरात एका पुजाऱ्याला वाळीत टाकण्याची घटना घडलीय. गेल्या दीड वर्षांपासून धनगर समाजानं बिरदेव देवालयातल्या बाळू पुजाऱ्यावर बहिष्कार टाकलाय. बाळू पुजारी आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींना तोड द्यावं लागतंय. पण त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कुणीच पुढं येत नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाशीमधल्या धनगर बाळू पुजारी यांनी गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या डोळ्यात असेच अश्रू तरळतायत. गावातल्या बिरदेव देवालयात त्यांचा पुजेचा हक्क असतानाही त्यांच्याच धनगर समाजानं त्यांच्यावर बहिष्कार टाकलाय. त्याची झळ त्यांच्या कुटुंबालाही बसलीय. अनेक वेळा बाळू पुजारी आणि त्यांच्या मुलांनी मंदिरात जावून पूजा करण्याचा प्रयत्न केला. पण समाजातल्या इतर लोकांनी त्यांना दमदाटी करुन मंदिरातून हाकलून दिलं. त्यामुळं करायचं काय? असा प्रश्न त्यांच्या पुढं उभा ठाकलाय.
१८ वर्षांपूर्वी बाळू पुजारी आणि धनगर समाज यांच्यामध्ये बिरदेव देवालयाशेजारील जागेसंदर्भात तोंडी व्यवहार झाला होता. पण, समाजातल्या लोकांनी तो व्यवहार वेळेत पूर्ण केला नाही. त्यामुळं बाळू पुजारी यांनी आपली जागा देवस्थानला न देण्याचं ठरवलं. तेव्हापासून आजपर्यंत बाळू पुजाऱ्याला समाजानं वाळीत टाकलंय. एव्हढंच नव्हे तर मुलांना मंदिरात पूजा करायला मज्जाव करुन समाजातल्या इतरांनी त्यांच्या शेतात काम करण्यासही बंदी घातलीय आणि तसा प्रयत्न कुणी केलाच तर त्यांनाही दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
बाळू धनगर आणि त्यांच्या मुलांनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून कोल्हापुरातल्या करवीर पोलिसांकडं ऑक्टोबर २०१२ मध्ये दाद मागितली, पण तिथही त्यांना न्याय मिळाला नाही. उलट पोलिसांची दमदाटी त्यांना सहन करावी लागली. ‘झी मीडिया’नं बिरदेव देवालयाच्या अध्यक्षांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपण त्यांच्यावर बहिष्कार टाकला नसून केवळ समाजापासून दूर राहायला सांगितल्याचं अजब उत्तर दिलंय.
वाशीच्या बिरदेव देवाची ख्याती अनेक राज्यामध्ये आहे. असं असताना या मंदिरातील पुजाऱ्यालाच वाळीत टाकण्याची घटना घडलीय, त्यामुळं सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं या संदर्भात तत्काळ कडक पाउल उचलून बाळू पुजाऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी होतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.