Shah Rukh Khan: शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर 2024 मध्ये चाहते शाहरुख खानच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु, यावर्षी शाहरुख खानचा एकही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. मात्र, शाहरुख खान सध्या त्याची मुलगी सुहाना खानसोबत 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच शाहरुख खानचा 31 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बाजीगर' चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
'बाजीगर' चित्रपटाने शाहरुख खानला रातोरात सुपरस्टार बनवले होते. हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये शाहरुख खानने खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांनी 'बाजीगर' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. दरम्यान, या चित्रपटातील शाहरुख खानची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली होती. ज्यामध्ये शाहरुख खान शिल्पा शेट्टीला इमारतीवरून खाली फेकून देतो.
'बाजीगर' चित्रपटाचा सिक्वेल येणार
टाईम्सच्या मुलाखतीत रतन जैन यांनी सांगितले की, शाहरुख खानच्या 'बाजीगर' चित्रपटाच्या सिक्वेल संदर्भात सध्या चर्चा सुरु आहे. अद्याप या चित्रपटाच्या सिक्वेलची स्क्रिप्ट अजून तयार झालेली नाहीये. परंतु, जर शाहरुख खान पुन्हा एकदा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असेल तर निर्माते या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करतील. सध्या त्याच्याकडे या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक रोमांचक कल्पना देखील आहे. उत्कृष्ट स्क्रिप्टसोबतच एका नव्या दिग्दर्शनाची गरज आहे. सध्या शाहरुख खानसोबत या चित्रपटाच्या सिक्वेलसंदर्भात चर्चा सुरु आहे.
कधी प्रदर्शित झाला होता 'बाजीगर'
शाहरुख खानचा 'बाजीगर' चित्रपट 12 नोव्हेंबर 1993 मधये प्रदर्शित झाला होता. सध्या या चित्रपटाला 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटात काजोलने देखील काम केले होते. त्यासोबतच शिल्पा शेट्टी, राखी, सिद्धार्थ रे, जॉनी लीवर देखील या चित्रपटात होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केले होते.
दरम्यान, 'बाजीगर' चित्रपटाच्या सिक्वेलसाठी शाहरुख खान काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण सध्या शाहरुख खान 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची मुलगी सुहाना खान देखील दिसणार आहे.