श्रीलंकेकडून चॅम्पियन्सचा लाजिरवाणा पराभव

चॅम्पियन्स ट्रॉफीला गवसणी घातल्यानंतर चॅम्पियन्स असल्याच्या धुंदीत वावरणाऱ्या टीम इंडियाला विंडिजनंतर श्रीलंकेनीही पराभवाची चव चाखायला लावली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 3, 2013, 11:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, जमैका
चॅम्पियन्स ट्रॉफीला गवसणी घातल्यानंतर चॅम्पियन्स असल्याच्या धुंदीत वावरणाऱ्या टीम इंडियाला विंडिजनंतर श्रीलंकेनीही पराभवाची चव चाखायला लावली आहे. श्रीलंकेने तब्बल १६१ रन्सने टीम इंडियाला पराभव केलाय. ट्राय सीरिजमधील टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय. यामुळे आता स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी टीम इंडियाला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

ट्राय सीरिजमध्ये वेस्ट इंडिजनंतर आता श्रीलंकेनेही टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिलाय. विशेष म्हणजे टीम इंडियाला तब्बल १६१ रन्सने लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. उपुल थरंगा आणि महेला जयवर्धनेच्या तडाख्यासमोर टीम इंडियाच्या बॉलर्सने अक्षरश: नांगी टाकली. थरंगा आणि जयवर्धनेने तब्बल २१३ रन्सची ओपनिंग पार्टनरशिप दिली. थरंगाने नॉट आऊट १७४ तर जयवर्धनेने १०७ रन्सची इनिंग खेळली. थरंगा-जयवर्धने जोडी फोडण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना काही यश येत नव्हत. अखेर जयवर्धने १०७ रन्सवर असताना अश्विनला त्याला आऊट करण्यात यश आल.
यानंतर मैदानात उतरलेल्या एँजलो मॅथ्यूजनेही थरंगाला चांगली साथ दिली. मॅथ्यूजने नॉट आऊट ४४ रन्सची इनिंग खेळली. थरंगा आणि जयवर्धनेच्या तडाखेबंद इनिंगच्या जोरावर श्रीलंकेने ३४८ रन्सचा विशाल स्कोअर उभा केला. लंकेच्या ३४८ रन्सच्या विशाल स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या बॅट्समनची चांगलीच दमछाक झाली. टीम इंडिया ४५ व्या ओव्हर्समध्ये १८७ रन्सवरच ऑल आऊट झाली. टीम इंडियाकडून सर्वाधिक नॉट आऊट ४९ रन्स रवींद्र जाडेजाने केल्या. शिखर धवन आणि रोहित शर्मा केवळ १२ रन्सचीच ओपनिंग देऊ शकले. रोहित ५ तर धवनने २४ रन्स केल्या. आता सलग दोन पराभव स्वीकारल्याने टीम इंडिया ट्राय सीरिजमध्ये अखेरच्या स्थानावर पोहचली आहे. तर मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे श्रीलंकेला एक बोनस पॉइंट बहाल करण्यात आला. आता टूर्नामेंटमधील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला आगामी दोन्हीही लढती चांगल्या फरकाने जिंकणं आवश्यक आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.