www.24taas.com, पर्थ
ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगने क्रिकेटला गुडबाय केलं. मात्र, त्याची वेळ चुकली असंच म्हणावं लागेल. कारण पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का बसला. आज पॉंटिंगने केवळ आठ धावा केल्याने क्रिकेट प्रेमींच्या निराशा झाल्या.
पॉंटिंगला आपल्या अखेरच्या कसोटी डावातही त्याच्या लौकिकास साजेसा खेळ करता आला. रॉबिन पीटरसनच्या गोलंदाजीवर जॅक कॅलिसने पॉंटिंगचा आठ धावांवर असताना झेल टिपला. हा क्षण पॉंटिंगसाठी अखेरचा ठरला. पॉंटिंगने क्रिकेटला गुडबाय केलं.
दरम्यान, सांघिक कामगिरीचे चांगले प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३०९ धावांनी पराभव केला. आपणच आता खरे बादशहा असल्याचे दक्षिण आफ्रिकेने दाखवून देत कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले.
.
दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ६३२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३२२ धावांत संपुष्टात आला.
आफ्रिकेकडून डेल स्टेन, रॉबिन पिटरसन यांनी प्रत्येकी तीन, तर मॉर्नी मॉर्केल, व्हेर्नान फिलँडर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ईडी कोवान (५३ धावा), मिचेल स्टार्क (नाबाद ६८) यांनी अर्धशतके झळकाविली.
पहिल्या दोन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर रिकी पॉंटिंगची अखेरचा सामना असताना त्याला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र, या संधीचा तो लाभ उठवू शकला नाही.